वृक्षासम देऊ छाया , धरिणीसम अन्न पोटी
सरितेसम शमवू तृष्णा , ना मिरवू प्रतिष्ठा खोटी
दर्यासम होऊ दिलदार , निश्चयाचा बनू मेरू
वाऱ्यासम होऊ वाहक , वाटप ज्ञानाचे करू
पाषाणासम होऊ अभेद्य , पात्यापरी विनम्र कधी
नभासम कधी देऊ आसरा , विठोबाची लेकुरे कधी
पुष्पासम होऊ प्रसन्न , घेऊ फळांचे माधुर्य
मातीसम होऊ सुगंधी , असोत नकोशी कार्य
वनराईचे गांभीर्य घेऊ , किलबिल घेऊ पक्षांची
वादळासम होऊनि झुंझार , शांतता घेऊ माळाची
वेलीसम घट्ट बिलगू , रेतिसम निसटू कधी
पालवीसम नव्याने बहरू , पानगळीपरी घेऊ समाधी
असंख्य हाती देतो , ना ठेवता हातचे
नतमस्तक होऊनि चरणी , आपणही गिरवायचे
ना मागता शिकवतो , जीवन कैसे जगायचे
तोचि एक परमगुरु , निसर्ग त्यास म्हणायचे
- अंकुश