गुरुवार, ७ मार्च, २०२४

माधुरी

 परवा चक्क स्वप्नात माधुरी आली, 

गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली 


पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं

खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं


नविन शर्टची घडी मोडली 

चापून चोपून ढेरी लपवली 


तंद्रीत गुणगुणत, घरभर संचार केला 

“डबा नको वाटतं आज ...”, मागून आवाज आला 


वरपासून खालपर्यंत, "घरच्या" माधुरीने न्याहाळलं 

“परत स्वप्न वाटतं ...”, खोचक हसून विचारलं 


विचारून बघा एकदा, येतेस का घरी 

हवंच आहे कोणीतरी ,वरकामाला बरी 


“तुझं आपलं काहीही ...” खोटा हशा काढला 

वरकामाला माधुरी? अंगावर काटाच आला 


शांतता थोडी भंगावी, म्हणून जरा चुळबुळ केली 

येताना आणायच्या सामानाची, यादीच हाती आली 


एव्हाना स्वप्नाचं "माधुर्य" , जिभेवरून सरलं  होतं 

स्वर्गलोकातून भूलोकावर, आमचं जहाज उतरलं होतं 


आमच्या डब्याची जेंव्हा, मित्रांनी स्तुती केली 

घरची माधुरी तेंव्हा, स्वप्नापेक्षा खास वाटली 


सामानासोबत गजरा घेतला, तिला खुश करेन 

प्रेमाच्या चार गोष्टी, तिच्याशीच करेन 


"त्या" माधुरीने नाही, तर हिने मला वरलंय 

आमचं कठीण पुस्तक , फक्त हिलाच उमगलंय 


-अंकुश 

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

माझ्या विशीतला मी...

 परवा एका photo मध्ये, अचानक तू दिसलास 

ओळखलंच नाही तुला, किती वेगळा भासलास 


किती सुडौल अन मापात होतास तू 

ऊर्जेचा न आटणारा, झरा होतास तू 


बेफिकिरी तर फोटोतूनही जाणवत होती 

जग जिंकण्याची उर्मी, डोळ्यात होती 


एका ठिकाणी पाय तुझा टिकत नसे 

वायू संचारे कि लाभले पंख जसे ?


बघेल तेंव्हा घोळक्यात, एकांत काय असतं ?

दोस्ती म्हणजेच life, बाकी सब झूठ असतं 


समय क्या चीज हैं, काय दिवस काय रात्र 

सुकून हैं वही, जिथे असू एकत्र 


तुला असा पाहून, आरशात पाहायला नकोच वाटले 

माझ्या "विशीतल्या मी ला" , परत कपाटात ठेऊन टाकले 


तुझ्या विषयीचा विचार, पण डोक्यात घोळत राहिला 

नकळत अन आरशात , चेहरा पुन्हा दिसला 


हे हि काही वाईट नाही, नसेल जरी 'तसे' 

फिकट होतातच कि रंग, चित्रातले जसे 


नवीन काही हाताला, लागल्यासारखे वाटले 

नव्यानेच स्वतःला , सापडल्यासारखे वाटले 


"माझ्या विशीतल्या मी ला" आता, अधेमधे बाहेर काढतो 

"हर फिक्र को धुवें में उडाता...", सध्या बरंच गुणगुणतो 


-अंकुश 


शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

संयम पुन्हा साधू दे...

 

मला ना अताशा तुझा,

कंटाळा यायला लागलाय 

खेळणं बनून हातचं,

जीव नकोसा झालाय 


चुका करतोस तू आणि,

दूषणं मला मिळतात 

व्यसनांच्या क्रमवारीत सध्या,

पहिलं स्थान मला देतात 


रोज सकाळी उठून,

माझ्यात डोकं खुपसतोस 

हरी नाम सोडून,

Siri नाम घेतोस 


कशाला हव्यात सारख्या,

चौकश्या जगाच्या 

अंतरंगात  बघ किती,

बदललंय स्वतःच्या 


काढू नको बाहेर मला 

प्रत्येक क्षण टिपायला 

काजळाच्या डब्या आहेत ना,

टिपून आठवणीत साठवायला 


मी म्हणजे साधन आहे,

साध्य मात्र अजिबात नाही 

जाणीव करून देणे माझे काम,

मी म्हणजे ' जाणिवा '  नाही 


होऊ दे रे मला drain,

रितं रितं बरं वाटतं

तू हि हो की मोकळा,

बघ कसं शांत वाटतं 


बघ राहून माझ्याशिवाय,

एक दिवस मलाही राहू दे 

कुठं चुकलं शोधू दोघेही,

संयम पुन्हा साधू दे 


-अंकुश 

रविवार, १६ जुलै, २०२३

प्रश्न...

 अमुक असं का, तमुक असं का नाही 

प्रश्न वाढतात रोजचे, उत्तर मिळत नाही 


विचारांचा गुंता होतो आणि डोक्याचा भुगा

सोडवू प्रश्न कसे, कृपया कोणीतरी सांगा


मलाच पडतात का, प्रश्न असे क्लिष्ट अन अवघड ?

मीच वाहतोय का, नैतिकतेची अन तत्वज्ञानाची कावड? 


तुम्ही करता का, विचार कधी खोल ?

मती जिथे गुंगते अन तत्वज्ञान ठरतं फोल ?


पण कधीतरी अचानक एखादं उत्तर मिळून जातं

अस्तित्वाचं सार थोडं थोडं उलगडून जातं 


प्रश्न सतत पडणं, हेही वरदान नव्हे काय ?

रोज थोडं उलगडणे, हेच जीवन नव्हे काय?


मार्ग दाखवी तो गुरु, आणि चाले तो शिष्य 

अनुभूतींचा प्रवास म्हणजेच तर खरं आयुष्य 


त्यातूनही अनुत्तरित, राहतील काही गोष्टी

जन्म देऊन पुन्हा, संकेत देईल सृष्टी 


- अंकुश  

गुरुवार, २ मार्च, २०२३

तेच तेच परत परत ...

 

अजून एक गिरकी घेतली, स्वतःभोवती वसुधेने

आला दिवस तसाच गेला, घडले नित्य नेमाने 


आयुष्य साला अगदी, copy-paste  झालंय

आजचे, उद्याचे, सगळे अगदी same झालंय 


भाज्यांनीही आपापसात, वार वाटून घेतलेत 

तीच चव, तोच वास, सगळेच ओळखीचे झालेत 


कपड्यांची पण तीच तऱ्हा, नंबर येतो आलटून पालटून 

तेच नऊ दर वर्षी, नवरात्रीला ठरवून 


फिरायलाही तिथेच जातो, शनिवार -रविवार येता

तेच hotels, त्याच dishes, खायची वेळ होता 


तेच तेच कार्यक्रम बघतो, TV वर आणि  Mobile वर

आताशा तर हसू हि येत नाही, त्याच त्याच विनोदावर 


वेगळे काहीतरी करून, वाटते जमाना झाला 

आणि आम्ही नित्य म्हणतो, routine चा कंटाळा आला 


उत्सुकता आणि रसिकता, जशी आमची हरवली 

एकाच दिशेत प्रवास, जशी दिली कोणी किल्ली 


आमचाच रोबो झालाय, रोबो बनवताना 

चौकटीत अडकलोय, सोडून स्वछंदीपणा 


- अंकुश 



गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

मी आणि तो ...

 

आमचा संवाद रोजचा नाही

नाही आम्ही एका पंगतीत

अस्तित्व दोघांचेही मान्य,

माझे कालमर्यादित, त्याचे कालातीत


मी करतो माझे कर्म,

तो करतो निर्मिती त्याची,

दमछाक माझी माझ्याच संसारात,

तरतूद तो करतो लाखोंची


हतबल होता अधी मधी,

जाऊन तडक भेटतो त्याला,

गाभाऱ्यातून हसून म्हणतो,

"काय, लई दिसांनी आला..."


गर्दी पांगून गेल्यावर मी,

गातो माझी रडगाणी,

मन डोलवत दाद तो देतो,

जशी माझी अमृतवाणी?


"मन दिलंस उगाच.. ,

शरीर होते पुरेसं",

तो तसाच स्थितप्रज्ञ,

जरी मी बोललो नकोसं


तुझ्यासारखं राहायला,

मला जरा शिकव,

तो म्हणे तुकारामाचा,

अभंग एखादा ऐकव


"भले देऊ कासेची लंगोटी,

नाठाळांच्या माथी हाणू काठी "

तूच शोधलास की मार्ग तुझा,

येत जा, असाच, भेटीसाठी...


परत जातो गाभाऱ्यात तो,

माझा मार्ग मलाच दाखवीत,

चिंता आम्हा दोघांनाही,

माझ्या कालमर्यादित, त्याच्या कालातीत 


- अंकुश 

माधुरी

 परवा चक्क स्वप्नात माधुरी आली,  गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली  पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं नविन शर्टची घड...