"उठला का वाघोबा ?" म्हणे आजी नेहमी
असू जरी भित्रे, लहानपणी आम्ही
मऊ गोधडीत आजीच्या, झोप मस्त येई
फॅन्सी चादरी बाजारात , ऊब त्यात नाही
पोट भरता तुडुंब , डोळे हळूच मिटू लागती
खाऊ शेकडो आजीचे , चिऊ -काऊ घास देती
ताजा गोळा लोण्याचा, जेंव्हा पडे हातावर
हात पुसायला साडी तिची , अलगद खाऊन झाल्यावर
चोळून देई अंग जेंव्हा, करे चंपी तेलाची
माझ्या बरोबर आंघोळ होई, जंगलातल्या प्राण्यांची
गोष्टींना तर नसे सुमार , राजा -राणी -मंत्री हुशार
होईन मग मी लाकूडतोड्या , वनदेवी ती गोंडस फार
हमखास जागा लपायची ती , आई जेंव्हा ओरडे
हळूच देऊन खाऊ हवासा , समजावी ती थोडे
"अल्लामंतर कोल्हामंतर" बाऊ जाई पळून
सुरकुतलेल्या हातांमध्ये , जादू होती भरभरून
"शुभंकरोती कल्याणम " दिवेलागणीला न चुकता
वर्ग हवेत कशाला जर , संस्कार होती येता जाता
आजी म्हणजे दुसरी माय , आजी म्हणजे घट्ट साय
आजी म्हणजे सखा सोबती , अखंड तेवणारी शांत ज्योती
-अंकुश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा