"जास्तीची मेजॉरिटी " सहज परवा म्हणून गेलो
गल्लीत बालपणीच्या, फेर-फटका मारून आलो
चखायची हि पद्धत , सगळीकडे सारखी होती
तीनात एक अन पाचात तीन , मोज-मापे ठरली होती
शब्द काय आणि अर्थ काय , फिकीर तेंव्हा फार नव्हती
"आय बिमा सीमा बिमा " वर , टाळ्या सगळी पिटत होती
विषामृत अन पळापळी , कधी लंगडी अन जोड-साखळी
दमून-भागून घामट होता , time-please ची रीत आगळी
गोट्या असे नाव मुलाचे अन खेळ नेमबाजीचा
ओबड-धाबड फरशा रचून , डाव रंगे लगोरीचा
उन्हात खेळण्यास आई ओरडे , मोर्चा वळे घराकडे
Carrom आणि पत्त्यांचा मग , डावांमागून डाव झडे
लावून सायकल स्टॅण्डवर , चाक होई विकेट
माझी बॅट पहिली batting , असे चाले क्रिकेट
half pitch च्या खेळाडूंना , demand जरा जास्त होती
एक टप्पा out ची, मजा काही औरच होती
डाव खेळता रडीचा कोणी , खेळ जरा थांबे
दिवेलागणीच्या पुढे मग , थोडा वेळ लांबे
डोळस कोशिंबीर खायला अन आंधळी खेळायला
अंधाराची घेऊन कड लपंडाव सुरु झाला
नव्हती कसली घाई , ना कसली खंत
अनंत होता वेळ आणि अमर्याद उसंत
सोडली होडी कागदाची , पाण्यासोबत गेली वाहून
हवीहवीशी उसंत , तिथेच गेली राहून
असून सारे अवतीभवती , काहीतरी हरवलंय
उसंतच असेल कदाचित , जे मी गमवलंय
- अंकुश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा