परवा चक्क स्वप्नात माधुरी आली,
गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली
पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं
खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं
नविन शर्टची घडी मोडली
चापून चोपून ढेरी लपवली
तंद्रीत गुणगुणत, घरभर संचार केला
“डबा नको वाटतं आज ...”, मागून आवाज आला
वरपासून खालपर्यंत, "घरच्या" माधुरीने न्याहाळलं
“परत स्वप्न वाटतं ...”, खोचक हसून विचारलं
विचारून बघा एकदा, येतेस का घरी
हवंच आहे कोणीतरी ,वरकामाला बरी
“तुझं आपलं काहीही ...” खोटा हशा काढला
वरकामाला माधुरी? अंगावर काटाच आला
शांतता थोडी भंगावी, म्हणून जरा चुळबुळ केली
येताना आणायच्या सामानाची, यादीच हाती आली
एव्हाना स्वप्नाचं "माधुर्य" , जिभेवरून सरलं होतं
स्वर्गलोकातून भूलोकावर, आमचं जहाज उतरलं होतं
आमच्या डब्याची जेंव्हा, मित्रांनी स्तुती केली
घरची माधुरी तेंव्हा, स्वप्नापेक्षा खास वाटली
सामानासोबत गजरा घेतला, तिला खुश करेन
प्रेमाच्या चार गोष्टी, तिच्याशीच करेन
"त्या" माधुरीने नाही, तर हिने मला वरलंय
आमचं कठीण पुस्तक , फक्त हिलाच उमगलंय
-अंकुश