आमचा संवाद रोजचा नाही
नाही आम्ही एका पंगतीत
अस्तित्व दोघांचेही मान्य,
माझे कालमर्यादित, त्याचे कालातीत
मी करतो माझे कर्म,
तो करतो निर्मिती त्याची,
दमछाक माझी माझ्याच संसारात,
तरतूद तो करतो लाखोंची
हतबल होता अधी मधी,
जाऊन तडक भेटतो त्याला,
गाभाऱ्यातून हसून म्हणतो,
"काय, लई दिसांनी आला..."
गर्दी पांगून गेल्यावर मी,
गातो माझी रडगाणी,
मन डोलवत दाद तो देतो,
जशी माझी अमृतवाणी?
"मन दिलंस उगाच.. ,
शरीर होते पुरेसं",
तो तसाच स्थितप्रज्ञ,
जरी मी बोललो नकोसं
तुझ्यासारखं राहायला,
मला जरा शिकव,
तो म्हणे तुकारामाचा,
अभंग एखादा ऐकव
"भले देऊ कासेची लंगोटी,
नाठाळांच्या माथी हाणू काठी "
तूच शोधलास की मार्ग तुझा,
येत जा, असाच, भेटीसाठी...
परत जातो गाभाऱ्यात तो,
माझा मार्ग मलाच दाखवीत,
चिंता आम्हा दोघांनाही,
माझ्या कालमर्यादित, त्याच्या कालातीत
- अंकुश