Security Guard तिची बॅग चेक करत होता. तिची नजर त्याला शोधत होती. तेवढ्यात त्याचा आवाज मागून आलाच.
"नीट चेक कर रे मॅडम ची बॅग. आजकाल डब्यात पण बॉम्ब निघतात", तो हसून म्हणाला.
"ठेऊन घ्या मग डबा", तीही कमी नव्हती.
"नको, कोणाला उपाशी ठेवल्याचे पाप नको आपल्या माथी" , तो मिश्कीलपणे.
"लईच काळजी हाय", जाता जाता एक गोड कटाक्ष टाकत ती म्हणाली.
बऱ्याचदा ह्यांचा असा संवाद चालतो. कधी गोड , कधी तिखट, कधी मिश्किल , कधी भावुक.
मी आपल्या जागेवरून हे सगळे टिपत असतो. मला ऐकू येत नाही पण आता lip-reading करू शकतो.
एके दिवशी ती दुपारी lunch-time ला आली. हातात एक छोटा वेगळा डबा होता. गुलाबजामून होते त्यात. त्याचा वाढदिवस म्हणून खास बनवून आणलेले तिने. कोणी बघत नाही अशी खात्री करून हळूच तिने त्याला भरवलाही. आणि लाजून पटकन निघून गेली. ह्या प्रसंगाची चव, गुलाबजामून पेक्षा जास्त वेळ त्याच्या जिभेवर रेंगाळली असेल हे नक्की.
साहेब पण धीट.असंच एकदा त्याने बॅग चेक करायच्या बहाण्याने एक छोटेसे गिफ्ट तिच्या बॅगेत हळूच ठेवलं. संध्याकाळी तिचा हात जेंव्हा कानाकडे गेला तेंव्हा कळलं, earrings होत्या. दागिन्यांपेक्षा चेहऱ्यावरची ख़ुशी माणसाला जास्त सुंदर बनवते हे मला त्या दिवशी कळलं.
ही गोष्ट फुलणार असं मला वाटू लागलं. शेवटी माझी नजर फार लांबची नसली तरी दूरची आहे.
पण मग अचानक दोघे काही दिवस गायब झाले. मला पण चुकल्यासारखे होऊ लागले.
पण थोडेच दिवस... एक दिवस दोघे एकत्र आले. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र माझ्या नजरेतून सुटलं नाही. आणि हातातले २ डबे सुद्धा. तो म्हणाला. "भूक लागली तर जेऊन घे". त्यावर ती डोळे मिचकावत म्हणाली , "लईच काळजी हाय".
म्हटलं नव्हतं, माझी नजर दूरची आहे. ह्यांच्या काही निरागस आणि गोड प्रेमळ क्षणांचा मी साक्षीदार आहे. जर कोणाला ह्यांना आहेर द्यायचा असेल, त्यांनी माझ्या memory मधून ते क्षण निवडून त्याचा एक अल्बम बनवावा आणि तो ह्यांना भेट द्यावा.
अकल्पित आणि अविस्मरणीय भेट होईल ती.
- अंकुश