गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

मी आणि तो ...

 

आमचा संवाद रोजचा नाही

नाही आम्ही एका पंगतीत

अस्तित्व दोघांचेही मान्य,

माझे कालमर्यादित, त्याचे कालातीत


मी करतो माझे कर्म,

तो करतो निर्मिती त्याची,

दमछाक माझी माझ्याच संसारात,

तरतूद तो करतो लाखोंची


हतबल होता अधी मधी,

जाऊन तडक भेटतो त्याला,

गाभाऱ्यातून हसून म्हणतो,

"काय, लई दिसांनी आला..."


गर्दी पांगून गेल्यावर मी,

गातो माझी रडगाणी,

मन डोलवत दाद तो देतो,

जशी माझी अमृतवाणी?


"मन दिलंस उगाच.. ,

शरीर होते पुरेसं",

तो तसाच स्थितप्रज्ञ,

जरी मी बोललो नकोसं


तुझ्यासारखं राहायला,

मला जरा शिकव,

तो म्हणे तुकारामाचा,

अभंग एखादा ऐकव


"भले देऊ कासेची लंगोटी,

नाठाळांच्या माथी हाणू काठी "

तूच शोधलास की मार्ग तुझा,

येत जा, असाच, भेटीसाठी...


परत जातो गाभाऱ्यात तो,

माझा मार्ग मलाच दाखवीत,

चिंता आम्हा दोघांनाही,

माझ्या कालमर्यादित, त्याच्या कालातीत 


- अंकुश 

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

जाऊ दे रे सोड त्याला...

जाऊ दे रे सोड त्याला, डोक्याचा भुगा बास झाला 

सगळीच गणितं सुटत नसतात, खोलात जाऊन पाय रुततात

थोडासा वेळ जाऊ दे की, उद्याची सकाळ होऊ दे की

आजच सोडव नियम नाही, सुटेलच ह्याचा नेम नाही

थोडीशी तू  घे सवड, विषय थोडासा वेगळा निवड 

चिंता सोडशील जेंव्हा वाऱ्यावर, चित्त येईल तेंव्हा थाऱ्यावर 

मग बघ डोकं खाजवून, समिकरण एखादं येईल जुळून 

नाहीच जमलं अजूनही, तरी काही हरकत नाही 

चक्क हात वर कर, स्वतःला बिनधास्त मोकळं कर 

नको उगाच ओझं वाहू, स्वतःमध्ये देवाला पाहू

त्याला पण काही सुटली, फसलेली तुला दिली

स्वतःवर थोडी दया कर, राजा, थोडी मजा कर

आयुष्य असंच संपून जाईल, जगणं तुझं राहून जाईल 

म्हणूनच ....

जाऊ दे रे सोड त्याला, डोक्याचा भुगा बास झाला 


- अंकुश 



शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

दुनिया गयी भाड में ...

 

क्वचित मिळते सरळ-सोट वाट,

बाकी असतो वळणाचा घाट

साधं-सरळ आयुष्य नसतं,

ठरवलेलं बऱ्याचदा फसतं


कुठून कुठे पोचला,

यावर सारे यश ठरे

खळगे केले किती पार,

दुनिया त्याला विसरे


"दुनिया गयी भाड में",

मार त्यांना फाट्यावर

त्यांचा प्रवास ते करतील,

तुझा प्रवास तू कर 


तुझ्या 'चूका' सांगणारे,

मिळतील तुला पदोपदी 

'चूका' सांभाळून घेणारी,

व्यक्ती अगदीच एखादी


दुर्लक्ष करायला शिक,

गोंगाट कमी होईल

'खरी' माणसं गोळा कर

प्रवास तेवढाच सुकर होईल 


-अंकुश 




शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

अल्बम

Security Guard तिची बॅग चेक करत होता. तिची नजर त्याला शोधत होती. तेवढ्यात त्याचा आवाज मागून आलाच. 

"नीट चेक कर रे मॅडम ची बॅग. आजकाल डब्यात पण बॉम्ब निघतात", तो हसून म्हणाला. 

"ठेऊन घ्या मग डबा", तीही कमी नव्हती.

"नको, कोणाला उपाशी ठेवल्याचे पाप नको आपल्या माथी" , तो मिश्कीलपणे.

"लईच काळजी हाय", जाता जाता एक गोड कटाक्ष टाकत ती म्हणाली.


बऱ्याचदा ह्यांचा असा संवाद चालतो. कधी गोड , कधी तिखट, कधी मिश्किल , कधी भावुक. 

मी आपल्या जागेवरून हे सगळे टिपत असतो. मला ऐकू येत नाही पण आता lip-reading करू शकतो.


एके दिवशी ती दुपारी lunch-time ला आली. हातात एक छोटा वेगळा डबा होता. गुलाबजामून होते त्यात. त्याचा वाढदिवस म्हणून खास बनवून आणलेले तिने. कोणी बघत नाही अशी खात्री करून हळूच तिने त्याला भरवलाही. आणि लाजून पटकन निघून गेली. ह्या प्रसंगाची चव, गुलाबजामून पेक्षा जास्त वेळ त्याच्या जिभेवर रेंगाळली असेल हे नक्की. 


साहेब पण धीट.असंच एकदा त्याने बॅग चेक करायच्या बहाण्याने एक छोटेसे गिफ्ट तिच्या बॅगेत हळूच ठेवलं. संध्याकाळी तिचा हात जेंव्हा कानाकडे गेला तेंव्हा कळलं, earrings होत्या. दागिन्यांपेक्षा चेहऱ्यावरची ख़ुशी माणसाला जास्त सुंदर बनवते हे मला त्या दिवशी कळलं.


ही गोष्ट फुलणार असं मला वाटू लागलं. शेवटी माझी नजर फार लांबची नसली तरी दूरची आहे.


पण मग अचानक दोघे काही दिवस गायब झाले. मला पण चुकल्यासारखे होऊ लागले. 


पण थोडेच दिवस... एक दिवस दोघे एकत्र आले. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र माझ्या नजरेतून सुटलं नाही. आणि हातातले २ डबे सुद्धा. तो म्हणाला. "भूक लागली तर जेऊन घे". त्यावर ती डोळे मिचकावत म्हणाली , "लईच काळजी हाय".


म्हटलं नव्हतं, माझी  नजर दूरची आहे. ह्यांच्या काही निरागस आणि गोड प्रेमळ क्षणांचा मी साक्षीदार आहे. जर कोणाला ह्यांना आहेर द्यायचा असेल, त्यांनी माझ्या memory मधून ते क्षण निवडून त्याचा एक अल्बम बनवावा आणि तो ह्यांना भेट द्यावा.


अकल्पित आणि अविस्मरणीय भेट होईल ती.


- अंकुश 

शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

खडूस कुठला...

 

"एक मसाला डोसा", त्याने पैसे देऊन कूपन घेतले. मला पण मसाला डोसा, मी म्हणाले. मग लक्षात आलं, "मला पण "? त्याने ऐकले तर म्हणेल कॉपी करतेय मला. पण त्याचे लक्ष नसेलच. गेले मिनिटं मी त्याचा मागे लाईन मध्ये उभी आहे, एकदा पण वळून बघितले नाही. खडूस कुठला...
बऱ्याचदा महाराष्ट्रीयन काउंटर चे पोहे खातो, आज साऊथ इंडियन. ब्रेकफास्ट ला एकटाच असतो, लंच ला आणि इव्हनिंग टी ला असतात मित्र. Wait , I am NOT  stalking  him . फक्त टाईमिंग चा coincidence आहे. आणि तसेही मी का त्याला stalk  करू? असे काय सोने लागून गेलाय त्याला. कपडे old  fashioned , केस पण नीटनेटके नाहीत. आणि आता मागे उभी होते त्यावेळी कळले perfume चॉईस पण बारा नाही. पण साहेब टेचात असतात जसे काय सगळे ह्याच्याकडेच बघत आहेत सारखे. उद्योग नाहीत का आम्हाला? नाही म्हणायला गिटार तशी बरी खाजवतो. ऑफिस पार्टी मध्ये वाजवली होती. अजूनच भाव चढला मग. आमच्या प्रोजेक्ट मधल्या मुली पण, "किती छान वाजवतो ना तो ...".  बावळट कुठल्या...


ऑफिस मध्ये सोडा, बस मध्ये पण भाव खातो. माझ्या आधी स्टॉप चढतो. पण शेजारच्या सीट वर बॅग ठेवून पुस्तक वाचत बसतो. म्हणजे कोणी बसूच नये शेजारी. एकदा मी मुद्दामच म्हटले, "Excuse  Me  ! काढणार का बॅग?" मला वाटले नाराजी दाखवेल, दुसरीकडे बस म्हणेल. पण नाही...बॅग मांडीवर घेतली आणि डोके परत पुस्तकात खुपसून साहेब गुंग. म्हणजे शेजारी कोणी बसा, मला काहीच फरक पडत नाही. खडूस कुठला..

आज फ्रायडे म्हणून लवकर निघाले तर अवकाळी पाऊस. छत्री कुठून असणार बरोबर? रूम वर जाऊ पर्यंत दुसरी आंघोळच. कोणी सोडले पटकन तर किती बरे होईल असे वाटले आणि कधी नव्हे ते "उपरवाले ने सून ली..". "कुठे सोडू का?" बाईक वर तोच. मी तशीच उभी. त्याने परत विचारले, "पाऊस वाढलाय. कुठे सोडू का ?  "नाही... नको...", मी चाचरतच म्हणाले. "It is OK . मी तुझ्याच ऑफिस मध्ये आहे". मला गैर वाटायला नको म्हणून त्याने स्पष्टीकरण दिले. "माहित आहे मला. पण मला जरा काम आहे." मी उगाच म्हणाले. OK म्हणून तो निघून गेला. मी अजूनही confused  होते. एकदा वाटले बरी जिरवली, मी पण खडूसपणा दाखवला. मग वाटले त्याने तर आज खडूसपणा केला नव्हता, पण मी उगाच केला. चिडला असेल कदाचित. आता Monday  लाच कळेल काय ते त्याचा reaction वरून.

वीकएंड जाता जाईना. पण Monday  ला तो दिलाच नाही. बस मध्ये पण नाही आणि ऑफिस मध्ये पण. पुढचे - दिवस पण दिसला नाही. मग कळले त्याने कंपनी change केली, फ्रायडे त्याचा लास्ट डे होता. श्या... सांगता येत नाही ? बाय -बाय मेल पण नाही. कुठे गेलाय कोणास ठाऊक. LinkedIn वर कळेलचकुठे का जाईना पण,मला काय करायचंय.

खडूस कुठला...

-
अंकुश

माधुरी

 परवा चक्क स्वप्नात माधुरी आली,  गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली  पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं नविन शर्टची घड...